सिंदखेडराजा: पोकलॅन्ड मजुराला काठीने मारहाण
आनंद इंगळे
सिंदखेडराजा (प्रतिनिधी): तालुक्यातील डावरगाव शेत शिवारात पोकलॅन्डवर काम करणाऱ्या मजुराला विनाकारण शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केल्याची घटना २१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मजूर जखमी झाला असून, पोकलॅन्ड मशिनचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरबीड (ता.सिंदखेडराजा) येथील शेख अन्सार शेख सत्तार (वय ३७ वर्षे) हे व्यवसायने कंत्राटदार आहेत. त्यांचे पोकलॅन्ड मशिन डावरगाव शिवारात कामाला आहे. २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोकलॅन्डवरील मजूर रतनलाल नायक हा मशिनच्या खाली झोपलेला होता. यावेळी आरोपी शाम चव्हाण व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्या ठिकाणी येऊन, “तू या कामावर का आहेस?” असे म्हणत मजुराला अडविले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी मजुराला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातातील काठीने त्याला बेदम मारहाण करून जखमी केले. इतक्यावरच न थांबता आरोपींनी शेख अन्सार शेख सत्तार यांच्या पोकलॅन्ड मशिनची तोडफोड करून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केले आणि मजुराला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.
या प्रकरणी शेख अन्सार यांनी सिंदखेडराजा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ११८(१), ३५१(२) व ३५२, ३(५), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संजय डोंगरदिवे हे करीत आहेत.

