सुरा येथे जुन्या वादातून वृद्धाला काठीने मारहाण
आनंद इंगळे
देऊळगाव राजा (प्रतिनिधी): तालुक्यातील सुरा येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एका ७० वर्षीय वृद्धाला अडवून बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भास्कर एकनाथ चेके (वय ७० वर्षे, रा. सुरा) हे गुरुवारी, १९ मार्च २०२६ रोजी रात्री ६ वाजेच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने गावातून जात होते. यावेळी आरोपी प्रकाश सुरेश चेके (रा. सुरा) याने फिर्यादीची गाडी अडवली. जुन्या वादाचे निमित्त साधून आरोपीने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रागाच्या भरात आरोपीने जवळ असलेल्या वेळूच्या (बांबूच्या) काठीने भास्कर चेके यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात फिर्यादीच्या पाठीवर, डाव्या पायावर आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर जबर मार लागला आहे. मारहाण करतानाच आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर जखमी फिर्यादीने अंढेरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून अंढेरा पोलिसांनी आरोपी प्रकाश सुरेश चेके विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ११८(१), २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गावातील किरकोळ वादातून वृद्धाला झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कायंदे हे करीत आहेत.

