कौटुंबिक वादातून सख्ख्या मेहुण्यावर काठीने हल्ला
बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या साखळी बुद्रुक येथे कौटुंबिक वादातून एका ३५ वर्षीय तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी घडली. बहिणीला का मारहाण केली, असा जाब विचारल्याच्या रागातून आरोपीने आपल्याच नातेवाईकावर (मेहुण्यावर) हल्ला चढवला. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चिखली तालुक्यातील एकलारा येथील रहिवासी शेख समंदर शेख मुक्तार (वय ३५ वर्षे) यांची बहीण साखळी बुद्रुक येथे आरोपी सयद अनीस सयद सांडु (वय ४२ वर्षे) यांच्याकडे दिलेली आहे. आरोपी सयद अनीस याने काही कारणावरून फिर्यादीच्या बहिणीला मारहाण केली होती. बहिणीला झालेल्या या त्रासाबाबत विचारपूस करण्यासाठी फिर्यादी शेख समंदर हे २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास साखळी बुद्रुक येथे आरोपीच्या घरी गेले होते. “तू माझ्या बहिणीला का मारहाण केली?” असा जाब त्यांनी आरोपीला विचारला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी सयद अनीस याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने आरोपीने घरातील लाकडी काठी काढून फिर्यादी शेख समंदर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. केवळ मारहाण करून न थांबता, आरोपीने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत “तुला जीवाने मारून टाकीन” अशी धमकीही दिली.
जखमी अवस्थेत शेख समंदर यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस अंमलदार विकास सोनुने हे करीत आहेत.

