क्राईम जगत

मलकापुरात बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा थरारक प्रयत्न

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांच्या नाकावर टिच्चून बँकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील वर्दळीचा आणि महत्त्वाचा भाग असलेल्या हनुमान चौक परिसरातील भारत कला रोडवर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मध्यरात्री फोडण्याचा धाडसी प्रयत्न झाला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास, जेव्हा संपूर्ण शहर निद्रावस्थेत होते, तेव्हा एका अज्ञात सराईत चोरट्याने या एटीएम बूथमध्ये प्रवेश केला. चोरट्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, मोठ्या शिताफीने एटीएम मशीन फोडण्याचे काम सुरू केले. मात्र, मशीन फोडताना झालेल्या एका भीषण आवाजामुळे परिसरातील नागरिकांना जाग आली. आपली चोरी पकडली जाईल या भीतीने चोरट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने, मशिनमधील रोकड सुरक्षित असली तरी या घटनेने सुरक्षिततेच्या चिंधड्या उडवल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. सध्या परिसरातील खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमधून चोरटा सापडणार की पुन्हा एकदा ‘अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल’ एवढ्यावरच पोलीस समाधान मानणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, हनुमान चौक आणि व्यापारी भागात तातडीने पोलिसांची रात्रीची गस्त दुप्पट करण्यात यावी. बँकांनी आपल्या एटीएमवर २४ तास सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक करावे. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि चौकाचौकात हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी कायदप्रिय नागरिकांमधून होत आहे.

पोलीस गस्त फक्त कागदावरच? 

हनुमान चौक हा शहराचा हृदयभाग मानला जातो. याच परिसरात जर चोरटे एटीएम फोडण्यापर्यंत मजल मारत असतील, तर पोलिसांचा दरारा संपला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असते की नाही, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे. जर गस्त सुरू असती, तर चोरट्याची एवढी हिंमत झालीच नसती, असे नागरिक बोलत आहेत.

हा ‘ट्रेलर’ तर नाही ना?

हा प्रकार निव्वळ चोरीचा प्रयत्न नसून एक ‘पूर्वनियोजित कट’ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तोडणे आणि मध्यरात्रीची वेळ निवडणे यावरून चोरट्याने आधी रेकी केल्याचे स्पष्ट होते. आज चोरट्याला यश आले नसेल, पण उद्या मोठी घटना घडणार नाही याची खात्री काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बँक प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *