क्राईम जगत

चांडोळमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात राडा

अभिनय बोर्डे

 धाड, (प्रतिनिधी): चांडोळ येथे किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून धाड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका घटनेत दगडफेकीत फिर्यादी जखमी झाला असून, दुसऱ्या घटनेत अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

पहिली घटना:पानटपरीवर गायछाप मागताना वाद, एकाचे दात पाडले

मिळालेल्या माहितीनुसार, चांडोळ येथील पानटपरी जवळ घडली. फिर्यादी संतोष दगडू खनसरे (वय ३८ वर्षे) हे आपल्या शेतातून घरी परतत असताना गावातील एका पानटपरीवर ‘गायछाप’ची पुडी घेण्यासाठी थांबले होते. यावेळी आरोपी किरण शेवाळे तिथे आला आणि त्याने विनाकारण संतोष खनसरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तू मला शिवीगाळ का करत आहेस?” असा जाब विचारला असता, संतापलेल्या आरोपीने जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या तोंडावर आणि ओठावर जोरात मारला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. याचवेळी आरोपी क्रमांक २ अरुणा शेवाळे आणि आरोपी क्रमांक ३ रत्नमाला प्रभाकर सुरळकर या सुद्धा तिथे आल्या. त्यांनी संगनमताने फिर्यादीला चापटबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धाड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार शांताराम जाधव हे करत आहेत.

दुसरी घटना: दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून वाद आणि धमकी

याच घटनेच्या पार्श्वभूमीवर दुसरी तक्रार किरण सुखदेव शेवाळे (वय ३४ वर्षे) यांनी दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी ७ वाजता ते गावात आपली मोटारसायकल दुरुस्त करण्याचे काम करत होते. यावेळी आरोपी संतोष खनसरे, संकेत खनसरे आणि रोहन खनसरे हे तिथून जात असताना त्यांनी आपली दुचाकी थांबवली. जुन्या वादाची खुन्नस धरून आरोपींनी किरण शेवाळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर दोन आरोपींनीही त्यांना मारहाण करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या तक्रारीवरून धाड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास देखील पोलीस अंमलदार शांताराम जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एकाच गावातील दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यामुळे चांडोळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *