क्राईम जगत

जबडा फॅक्चर करून कुटुंबाला मारहाण

सिंदखेड राजा (बुलडाणा): तालुक्यातील पिंपरखेड येथे किरकोळ कारणावरून एका ६२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला दगडाने बेदम मारहाण करून त्यांचा जबडा फॅक्चर केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पिंपरखेड येथील रहिवासी फिर्यादी शंकर वाल्हु पवार (वय ६२ वर्षे) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून पवार यांच्यावर हल्ला चढवला. जुन्या वादातून किंवा किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठला. मुख्य आरोपी जगाराव किसन राठोड, संगीता जगाराव राठोड आणि सुजल जगाराव राठोड यांनी शंकर पवार यांना घेरले. यावेळी आरोपींनी त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर दगडाने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात पवार यांच्या तोंडाचा जबडा फॅक्चर झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. केवळ दगडानेच नव्हे, तर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. फिर्यादी शंकर पवार यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी मध्यस्थी आली असता, आरोपी सुजल राठोड आणि स्वाती आकाश पवार यांनी त्यांनाही सोडले नाही. स्वाती पवार यांनी फिर्यादीच्या पत्नीचे केस धरून त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सर्व आरोपींनी मिळून पवार कुटुंबाला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत, “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यामुळे पवार आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.
घटनेनंतर जखमी शंकर पवार यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यावर २३ मार्च रोजी किनगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जगाराव राठोड (वय ५० वर्षे), संगीता राठोड (वय ४५ वर्षे), सुजल राठोड (वय २६ वर्षे) सर्व रा. पिंपरखेड आणि स्वाती आकाश पवार (वय ३५ वर्षे) रा. खामगाव खापरखुटी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(२), २९६, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विश्वास काकड हे करीत आहेत. पिंपरखेड सारख्या शांत गावात दिवसाढवळ्या वृद्ध शेतकऱ्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *