‘पिंपरी’ पॅटर्नची धाडमध्ये पुनरावृत्ती!: सराईत दारू माफिया कैलास पवारला एका वर्षासाठी बुलढाणा जेलची हवा
अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदेवाईक आणि गावगुंडांना आता ‘यमराजा’च्या आधी धाड पोलिसांच्या खाकीचा दरारा वाटू लागला आहे. धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध हातभट्टीची दारू विकून तरुण पिढी बरबाद करणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कैलास ऊर्फ राजेंद्र जनार्दन पवार (वय ४० वर्षे) रा. ढालसावंगी या सराईत गुन्हेगाराला धाड पोलिसांनी अखेर ‘मोक्का’सदृश दणका देत एका वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ढालसावंगी (ता.बुलढाणा) येथील कैलास पवार हा ढालसावंगी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून हातभट्टीच्या दारूचा बेकायदेशीर व्यवसाय करत होता. या इसमावर पोलिसांनी यापूर्वीही अनेक प्रतिबंधक कारवाया केल्या, परंतु ‘पालथ्या घड्यावर पाणी’ अशी या गुन्हेगाराची प्रवृत्ती होती. याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासही घाबरत होते. अखेर धाड पोलिसांनी त्याचा कच्चाचिठ्ठा तयार करून जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्व पुराव्यांची पडताळणी केली असता, या गुन्हेगाराचे कृत्य हे समाजासाठी आणि तरुण पिढीसाठी घातक असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले व धोकादायक व्यक्ती कायद्यांतर्गत (MPDA) त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धाड पोलिसांची ‘बॅक टू बॅक’ कारवाई; अक्षय बिलंगेनंतर आता पवारची बारी!
धाड पोलिसांनी गुन्हेगारी जगताचे कंबरडे मोडण्याचा जणू विडाच उचलला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच अक्षय बिलंगे या सराईत गुन्हेगारावर धाड पोलिसांनी अशाच प्रकारे ‘स्थानबद्धतेची’ कठोर कारवाई केली होती. एकापाठोपाठ एक सराईत गुन्हेगारांना जेलची हवा दाखवून धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस आणि त्यांच्या टीमने गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवली आहे. “गुन्हेगारी सोडली नाही तर पुढचा नंबर तुमचाच,” असाच जणू इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.
कोण आहेत या मोहिमेचे नायक?
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रताप भोस, पोलीस अंमलदार रवींद्र बऱ्हाटे, देशमाने, राजू माळी, खमाटे, पठाण, महिला पोलीस अंमलदार वैशाली कोरडे, पोलीस अंमलदार भास्कर जाधव आणि स्थागुशाचे पोलीस अंमलदार संजय भुजबळ यांनी केली.

