मलकापूरसह जिल्ह्यातून २४ तासांत १० जण गायब!
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): एकीकडे जिल्हा पोलीस प्रशासन ‘सुरक्षेचे’ गोडवे गात असताना, दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या २४ ते ४८ तासांत महिला, मुली आणि मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. मेहकर, बुलढाणा शहर, सिंदखेडराजा, धामणगाव बढे, खामगाव आणि मलकापूर या सर्वच महत्त्वाच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एकामागून एक १० जण बेपत्ता झाले आहेत. ही केवळ आकडेवारी नाही, तर एका सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यासाठी लागलेली ही मोठी ‘भीतीची’ चादर आहे.
सुलतानपूरमधून आईसह ४ चिमुकले बेपत्ता!
मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुलतानपूर येथील सर्वात काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. २२ मार्च रोजी अनुराधा राजेश टकले (वय ३० वर्षे) या आपल्या तीन मुली-अमृता (वय १३ वर्षे), गौरी (वय १२ वर्षे), ऋतुजा (वय १० वर्षे) आणि ६ वर्षांचा मुलगा अनिकेत अशा चार लेकरांना घेऊन “बाहेरून येते” असे म्हणून घरातून निघाल्या. मात्र, दोन दिवस उलटूनही या मायलेकरांचा पत्ता लागलेला नाही. संपूर्ण कुटुंबच बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात केवळ ‘मिसींग’ची नोंद करून गप्प बसणार की शोधमोहीम तीव्र करणार, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.
बस स्थानक झालेत ‘अनसेफ’?
जिल्ह्यातील बस स्थानके ही बेपत्ता होण्याचे हॉटस्पॉट बनत चालली आहेत का? बुलढाणा शहरातील बस स्टँडवरून वैशाली दिलीप काळे (वय १८ वर्षे ६ महिने) ही कॉलेजला जाते म्हणून निघाली आणि तिथूनच गायब झाली. तिच्या डाव्या हातावर ‘वैशाली’ नावाचा टॅटू असून तिचा फोनही बंद येत आहे. तसाच प्रकार सिंदखेडराजा येथे घडला. महारखेड येथील कविता शंकर डिगोळे (वय २७ वर्षे) या महिलेला त्यांच्या दिराने बस स्टँडवर नेऊन सोडले, मात्र त्या माहेरी पोहोचल्याच नाहीत. सार्वजनिक ठिकाणांवरून तरुण मुली आणि महिला गायब होणे, हे पोलीस गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
मलकापूर आणि खामगावची स्थिती
मलकापूर येथील कोलते कॉलेजमध्ये गेलेली धनश्री नथ्यू चौधरी (वय १९ वर्षे) सायंकाळी घरी परतलीच नाही. इकडे खामगावच्या शिवाजीनगर परिसरातून दिक्षा उर्फ साक्षी किशोर गवई (वय २० वर्षे) ही नातेवाईकांसोबत असतानाच “सासऱ्यांचा फोन येतोय” असे सांगून बाजूला गेली आणि तिथूनच पसार झाली. या घटनेत प्रेमसंबंधाचा संशय व्यक्त केला जात असला, तरी भरवस्तीतून मुलींचे असे अचानक गायब होणे कायद्याचा धाक संपल्याचे लक्षण आहे.
- या सर्व प्रकरणांत पीडित कुटुंबीयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा, स्थानिक पोलिसांनी तातडीने सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन या बेपत्ता व्यक्तींचा शोध घ्यावा. जर येत्या काळात या प्रकरणांचा उलगडा झाला नाही, तर जनतेचा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. बुलढाणा जिल्ह्यात ‘माणसं गायब’ होण्याची ही मालिका तातडीने थांबणे गरजेचे आहे, अन्यथा हा जिल्हा गुन्हेगारांचे नंदनवन ठरायला वेळ लागणार नाही, एवढे मात्र खरे!

