महावितरणचा मनमानी कारभार थांबवा; अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन : ॲड. सुनील देशमुख
अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): धाड विभाग आणि परिसरातील ग्रामीण भागात महावितरणने सुरू केलेल्या अघोषित आणि चुकीच्या वेळेतील लोडशेडिंगमुळे नागरिकांचा संयम आता सुटला आहे. “रात्रीचे लोडशेडिंग बंद करा आणि ते दुपारी करा,” या मागणीसाठी परिसरातील ३० हून अधिक गावांतील ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या दोन दिवसांत बदल न झाल्यास महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय खाद्य महामंडळाच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य ॲड. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की महावितरणच्या कारभारावर कडाडून टीका करण्यात आली आहे. सध्या या भागात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ही वेळ नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीची असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या बोर्डाच्या आणि इतर महत्त्वाच्या परीक्षांचा काळ सुरू आहे. रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल संतप्त पालकांनी केला आहे. गावात अनेक वृद्ध आणि गंभीर आजारी रुग्ण आहेत, उपचारांसाठी विजेची नितांत गरज असते. रात्रीच्या वेळी वीज गुल झाल्यामुळे या रुग्णांच्या उपचारांत अडथळा निर्माण होऊन त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या अंधारामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. परिसरात चोरीच्या घटना किंवा जंगली श्वापदांची भीती वाढल्याचे निवेदनात नमूद असून दोन दिवसांत लोडशेडिंगच्या वेळेत बदल न झाल्यास, परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील ॲड. सुनील देशमुख यांच्यासह भाजपचे आक्रमक नेते देविदास पाटील जाधव, विशाल विसपुते, विजय सावळे, सुभाष सावळ, दीपक गुळवे, सचिन जैस्वाल, संजय देशमुख, नामू नरवाडे, विनोद शिनकर, अनिल नरोटे, परशराम शिनकर, नामदेव नरवाडे, शेषराव सावळे, कडूबा आल्हाट, सुधाकर पवार, सूर्यदेव लांडगे, किशोर राऊत, कौतिक भोसले, विजय राऊत, भानुदास गोरे, कैलास आपार, अनिल सोनुने, रमेश नरवाडे, वसंत पवार, कृष्णा धुळे, सुभाष माळी, अशोक राऊत, धोंडीबा उबाळे, समाधान राऊत, शाम राऊत, कौतिक गुळवे, संतोष भोसले यांच्यासह पाडळी, गिरडा, जळनापूर, मसूरुल, धामणगाव, वरुड, टाकळी येथील नागरिकांनी दिला आहे.

