क्राईम जगत

गेल्या २४ तासांत पुन्हा चौघे बेपत्ता

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत पुन्हा चार व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये दोन तरुण, एक विवाहित पुरुष आणि एका तरुणीचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ‘मिसींग’ची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.

बुलढाणा: छत्रपती संभाजीनगर येथील शुभम संजय गारदे (वय २७ वर्षे) हा तरुण बुलढाणा येथे आपल्या बहिणीच्या मुलाच्या अन्नप्राशन कार्यक्रमासाठी आला होता. २४ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास त्याला बसमध्ये बसवून देण्यासाठी चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर येथून रिक्षामध्ये पाठवण्यात आले, मात्र तो घरी पोहोचला नाही.

देऊळगाव राजा: देऊळगाव राजा येथील आदर्श कॉलनीतील रहिवासी निवृत्ती अनिरुद्ध घुगे (वय ३५ वर्षे) हे २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ‘कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी जातो’ असे सांगून घरातून निघाले, ते अद्याप परतलेले नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद येत आहे.

संग्रामपूर: तालुक्यातील उकळी बुद्रुक येथील तरुण भारत विजय पालीवाल (वय ३० वर्षे) हा तरुण २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. नातेवाईकांकडे शोध घेऊनही त्याचा पत्ता लागलेला नाही.

सोनोशी: सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथील संघमित्रा गौतम वाघमारे (वय २० वर्षे) ही तरुणी २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरातून कोठेतरी निघून गेली आहे. तक्रारीनुसार, तिने जाताना सोबत ५० हजार रुपये रोख आणि दागिने नेले आहेत. वरील वर्णनाची कोणतीही व्यक्ती आढळल्यास किंवा त्याबाबत काही माहिती मिळाल्यास संबंधित तपास अधिकारी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन बुलढाणा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *