क्राईम जगत

धक्कादायक: बुलढाण्यात कोवळ्या मुलीला केले गर्भवती

बुलडाणा,(प्रतिनिधी): ज्या वयात हातात पुस्तकं आणि मनात स्वप्नं असायला हवीत, त्या वयात एका दहावीत शिकणाऱ्या कोवळ्या मुलीला ‘नराधमाच्या’ वासनेचा बळी ठरावं लागलं आहे. बुलडाणा शहरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? हा भीषण प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बुलडाणा शहरातील चंद्रमणी नगर भागातील १६ वर्षीय मुलगी, जी स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेत १० व्या वर्गात शिक्षण घेत आहे, तिचा परिचय भीम नगर भागातील आदर्श नरवाडे (वय १९ वर्षे) याच्याशी बालपणापासून होता. याच ओळखीचा फायदा घेत आदर्शने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी, आरोपीने पीडितेची भेट घेऊन तिला एका निर्जन घरात नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोवळ्या वयातील त्या मुलीला या संकटाची भीषणता उमजली नाही, मात्र जेव्हा तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि प्रकृती खालावली, तेव्हा तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आणि एकच खळबळ उडाली.

पीडितेच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी तत्काळ पावले उचलली आहेत. आरोपी आदर्श नरवाडे याच्यावर भारतीय न्याय संहिताचे कलम ६४(२)(एम), ६५(१), ३५१(३) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ४(२), ६, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि युवराज रबडे हे करत आहेत.

  • “आता तरी जागे व्हा!”
  • ही केवळ एक बातमी नाही, तर आपल्या समाजाच्या सडलेल्या मानसिकतेचा आरसा आहे. १९ वर्षांचा तरुण आणि १६ वर्षांची मुलगी… ज्यांना आयुष्याची दिशा कळायची आहे, त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. आरोपीने पीडितेच्या ओळखीचा आणि विश्वासाचा फायदा घेतला. ही ‘प्रेमाची’ व्याख्या असूच शकत नाही. हे कृत्य निव्वळ वासना आणि एका मुलीच्या भविष्याशी खेळणे आहे. आज आपली मुले काय करतात, कोणाला भेटतात आणि त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे, याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे का? १० वीत शिकणाऱ्या मुलीला अशा परिस्थितीतून जावे लागते, हे पालकत्वाचेही अपयश आहे. तर दुसरीकडे पोक्सो सारखा कडक कायदा असतानाही अशा घटना थांबत नाहीत, याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही. आदर्श नरवाडे सारख्या विकृत प्रवृत्तीच्या तरुणांना अशी शिक्षा मिळायला हवी की, पुन्हा कोणीही कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. मुलींना वाचवण्यासाठी केवळ ‘बेटी बचाओ’ चे नारे देऊन चालणार नाही, तर आपल्या घरातील मुलांना ‘स्त्री सन्मान’ शिकवावा लागेल. आज एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, उद्या ती कुणाचीही बहीण किंवा मुलगी असू शकते, हे समाजाने लक्षात घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *