क्राईम जगत

नांदुरा आणि खामगाव शहरात अवैध गॅस रिफिलिंगचा काळा बाजार उद्ध्वस्त!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): शहरातील चांदमारी घरकुल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैधपणे गॅसची चोरी करून तो रिक्षांमध्ये भरणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खामगाव शहर पोलिसांनी, तर शहरातील शाईन कॉलनी परिसरात अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका केंद्रावर नांदुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा छापा टाकून पर्दाफाश केला आहे. अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीत कोणताही सुरक्षिततेचा उपाय न योजता, केवळ पैशांच्या हव्यासापोटी मानवी जीवाशी खेळणाऱ्या वसीम खान नियामत खान (वय २४ वर्षे) याच्या मुसक्या आवळून पोलिसांनी ५२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर नांदुऱ्यातही आरोपी अलीम खान करीम खान (वय ४२ वर्षे) याला बेड्या ठोकून त्याच्या ताब्यातून ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खामगाव: मेहबूबनगर येथील चांदमारी घरकुल भागात काही दिवसांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरमधून अवैधरित्या गॅस काढून तो वाहनांमध्ये भरला जात होता. २३ मार्च २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास, आरोपी वसीम खान हा त्याच्या ताब्यातील रिक्षा एमएच-०५-सीजी-६६४४ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून हॅन्ड पंपच्या साहाय्याने अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस भरत असताना पोलिसांनी छापा टाकला. या धडक कारवाईत घटनास्थळावरून गॅस रिफिलिंग हॅन्ड पंप (किंमत १ हजार ५०० रुपये), रिफिलिंग नळी व पितळी कॉक (किंमत ५५० रुपये), एचपी कंपनीचे घरगुती गॅस सिलिंडर (किंमत ८५० रुपये), ऑटो रिक्षा क्रमांक एमएच-०५-सीजी-६६४४ (किंमत ५० हजार रुपये), असा एकूण ५२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अंकुश गुरुदेव यांच्या फिर्यादीवरून आरोपी वसीम खान याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत अशा प्रकारे गॅसची चोरी करणे म्हणजे मोठ्या स्फोटाला आमंत्रण देण्यासारखेच होते. कोणत्याही प्रकारच्या अग्निशमन उपाययोजना न करता, केवळ हलगर्जीपणा करून लोकांच्या प्राणांना धोका निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार भीमराव वानखेडे हे करत आहेत.

नांदुरा: शहरातील शाईन कॉलनी परिसरात अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका केंद्रावर नांदुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी गॅस रिफिलिंगचे साहित्य, कमर्शियल व घरगुती सिलिंडर आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण ८३,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शाईन कॉलनी भागात अवैधरित्या गॅसची चोरी करून ती भरली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २४ मार्च २०२६ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने पंचांसमक्ष या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपी अलीम खान करीम खान (वय ४२ वर्षे) रा. शाईन कॉलनी, नांदुरा हा बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून गॅस भरण्याचे ओयुसेन कंपनीचे पेट्रोल इंजिन आणि ॲग्री स्प्रेअर कंपनीचा कॉम्प्रेसर पंप (किंमत २५ हजार रुपये), दोन ‘Indane-XTRATEJ’ कमर्शियल सिलिंडर आणि दोन घरगुती वापराचे सिलिंडर (एक अर्धवट भरलेले व एक रिकामे), एक जुनी बजाज मॅक्सिमा ऑटो एमएच-५६-बी-०१२९ (किंमत ५० हजार रुपये) आणि इलेक्ट्रिक वजनकाटा आणि गॅस भरण्याच्या रबरी नळ्या, असा एकूण ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनतेमध्ये भीती आणि संताप

नांदुरा आणि खामगाव शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरगुती वापराचा गॅस हा अनुदानावर मिळतो, मात्र त्याचा असा व्यावसायिक आणि जीवघेणा वापर करणाऱ्यांविरुद्ध आता पोलिसांनी कंबर कसली आहे. “अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा सज्जड दम पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *