क्राईम जगत

बुलढाण्यात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

बुलढाणा,(प्रतिनिधी): शहरातील एकता नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळच्या सुमारास गजानन महाराज मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ येऊन चोरट्यांनी हे कृत्य केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील एकता नगरमध्ये राहणाऱ्या विजया अनिल कोल्हे (वय ५६ वर्षे) या गृहिणी आहेत. त्या एकता नगरमधील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपून त्या पायी आपल्या घराकडे परतत असताना, घराशेजारील कलंत्री यांच्या निवासस्थानासमोर त्या एका ओळखीच्या महिलेशी (बिडकर ताई) बोलत थांबल्या होत्या.

त्याच वेळी एका दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण तिथे आले. गाडीवरून उतरून त्यांनी कोल्हेंना ‘पत्ता’ विचारण्याचा बहाणा केला. विजया कोल्हे काही समजण्याच्या आतच, त्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची जुनी वापरती ‘मनीगंठण सोन्याची पोत’ जोरात हिसकावून घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, भरवस्तीत ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही सेकंदात चोरटे दुचाकीवर बसून एकता नगर पाटीच्या दिशेने वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फिर्यादी महिला प्रचंड घाबरली होती, ज्यामुळे त्यांना चोरट्यांच्या दुचाकीचा पूर्ण क्रमांक पाहता आला नाही.

या प्रकरणी विजया कोल्हे यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *