मलकापुरात तलवारीसह दहशत निर्माण करणारा तरुण जेरबंद
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शहराच्या वर्दळीच्या ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरातील हनुमान मंदिराजवळ हातात ‘स्टीलची गुप्ती’ (तलवार) घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला मलकापूर शहर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. आरोपीकडून ८०० रुपये किमतीचे घातक शस्त्र जप्त करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर शहर पोलीस ठाण्यातील पथक २४ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.१० वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असताना त्यांना बसस्थानकाजवळील हनुमान मंदिराच्या बाजूला एक तरुण हातात धारदार गुप्ती घेऊन मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असून, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, अशी माहिती होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित इसमाला पोलिसांनी पंचासमक्ष शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव अतुल भानुदास सोभागे (वय १९ वर्षे) रा. मु. अंधई, पो. शेलसूर, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे एक स्टीलची गुप्ती आढळून आली. सदर शस्त्राबाबत परवाना विचारला असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अंदाजे ८०० रुपये किमतीची एक स्टीलची गुप्ती जप्त केली आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार योगेश प्रभाकर तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कायद्याचे कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल शेले हे करीत आहेत.

