पुणे

खाकी वर्दीचं स्वप्न अपूर्णच; धावण्याच्या चाचणीत देऊळगाव राजाच्या सुपुत्राचा दुर्दैवी अंत!

पुणे,(प्रतिनिधी): अंगावर खाकी वर्दी चढवून आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो धावत होता… पाऊल वेगाने पडत होती आणि डोळ्यांसमोर फक्त ध्येय होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान १६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील २३ वर्षीय पुरुषोत्तम बारकुल या तरुणाचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळची वेळ नेहमीसारखीच उत्साहाची होती. पुरुषोत्तमने पहिल्या दोन फेऱ्या अत्यंत जिद्दीने पूर्ण केल्या. तिसऱ्या फेरीत मात्र अचानक त्याला अपस्माराचा झटका (फिट) आला आणि तो जमिनीवर कोसळला. सोबत धावणाऱ्या उमेदवारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तातडीने त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

पुरुषोत्तम हा देऊळगाव राजा येथील एका सामान्य कुटुंबातील तरुण होता. पोलीस होऊन घराचा आधार बनायचे, या जिद्दीने तो गेल्या अनेक महिन्यांपासून सराव करत होता. त्याच्या निधनाने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे. “साहब, मी वर्दी घालूनच परत येईन,” असे म्हणून घराबाहेर पडलेला पुरुषोत्तम आता कधीच परतणार नाही, या कल्पनेने त्याच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत.

प्रशासनाकडून हळहळ व्यक्त

भरती प्रक्रियेतील कठीण मानली जाणारी १६०० मीटरची चाचणी पुरुषोत्तमसाठी जीवघेणी ठरली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नशिबाने साथ दिली नाही. एका उमद्या तरुणाचा असा अंत झाल्याने पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पुरुषोत्तमचा मृत्यू ही केवळ एका उमेदवाराची एक्झिट नाही, तर एका स्वप्नाचा झालेला करुण अंत आहे. त्याच्या जाण्याने बुलढाण्याने एक जिद्दी तरुण गमावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *