देवधाबा येथील २५ वर्षीय तरुणाचा विषप्राशन केल्याने मृत्यू
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): तालुक्यातील देवधाबा येथील एका २५ वर्षीय तरुणाने तीन दिवसांपूर्वी विषप्राशन केल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सुनील कावळकर (वय २५ वर्षे) रा. देवधाबा या तरुणाने २३-२४ मार्चच्या सुमारास अज्ञात कारणावरून विषप्राशन केले होते. प्रकृती खालावल्याने नातेवाईक शिवाजी शांताराम कावळकर यांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून ‘मृत’ घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्या सूचनेवरून कक्ष सेवक राजू तुकाराम गोमटे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात वैद्यकीय मेमो सादर केला. या माहितीवरून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली २८ मार्च रोजी मर्ग दाखल करण्यात आला आहे. तरुणाच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, देवधाबा परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

