स्मार्ट बुलढाणा

धाड नगरीत अवतरली ‘अयोध्या’: श्री गजानन महाराज संस्थानात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न

अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): चैत्र शुद्ध नवमीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात रामलल्लाचा जन्मोत्सव साजरा होत असताना, धाड येथील गजानन महाराज संस्थानात हा सोहळा अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला. ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महिला भक्तांनी सजवलेला नयनरम्य पाळणा. विशेष परिश्रम घेऊन फुलांनी आणि वस्त्रांनी सजवलेल्या या पाळण्यात ‘इशांत’ या लहान बालकाला श्रीरामाच्या रूपात बसवण्यात आले होते. धनुष्यबाण धारण केलेल्या या बालरुपी रामाला पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी ठीक १२.३९ वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी महिलांनी पारंपारिक पाळणा गीते गाऊन भक्तीरस निर्माण केला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात आरती संपन्न झाली. संस्थानचा परिसर जणू ‘प्रति अयोध्या’ झाल्याचा भास भाविकांना होत होता.
उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला भक्तांनी केलेले शिस्तबद्ध नियोजन. दर्शनाची रांग असो वा महाप्रसाद वितरण, सर्वकाही अत्यंत सुव्यवस्थित पार पडले. आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्तांचा अमाप उत्साह आणि लहानग्या इशांतचे रामरूप पाहून मन प्रसन्न झाले. आज धाड नगरीत प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र अवतरल्याचा अनुभव आला, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *