स्मार्ट बुलढाणा

मेंडगाव धरणावरील पाच गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पेटणार

देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): मेंडगाव धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पाच गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून, चिखली लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी धरणावरील अवैध मोटारपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले. दरम्यान, काही दिवसांनी पुन्हा वीज जोडणी करण्याचे पत्र दिल्यामुळे चिखली पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मेंढगाव धरणातून परिसरातील मेरा, मनुबाई, मेंडगाव, बायगाव बुद्रुक या पाच गावांना पिण्याच्या पाणी आरक्षित करण्यात आले आहे. सध्या स्थितीत या धरणामध्ये केवळ १३ टक्के जलसाठा आहे. अशा परिस्थितीमुळे येणाऱ्या काळात संबंधित पाच गावांना तिव्र पाणीटंचाई भासणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटणार आहे. या पृष्ठभूमिवर संबंधित पाच गावांना पाणीटंचाई भासू नये म्हणून, या धरणातून शेतीच्या वापरासाठी अवैध विद्युत मोटार असणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र ११ मार्च रोजी अंढेरा येथील कनिष्ठ अभियंता यांनी दिले. दरम्यान, बायगाव बुद्रुक येथील काही शेतकऱ्यांनी शेतात भुईमूक पिके असल्यामुळे वीज पुरवठा खंडित न करण्याचे पत्र उपविभागीय चिखली यांना दिल्यामुळे २७ मार्च रोजी पुन्हा अंढेरा कनिष्ठ अभियंता यांनी वीज पुरवठा जोडणीसाठी पत्र दिले. त्यामुळे पिण्याचे पाणी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायतींनी डोकेदुखी वाढली आहे. दिवसे्दिवस उन्हाची दाहकता वाढत असून धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. धरणात प्रत्यक्षात केवळ मृद १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात अवैध मोटारपंपव्दारे पिकांसाठी पाणी घेतल्यास नळ योजना असलेल्या पाणी आरक्षित असलेल्या गावांना तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून ग्रामस्थांमध्ये पाण्यासाठी उद्रेक होण्याची शक्यता आहे.

कालव्याचे गेट उघडणाऱ्यावर कारवाई करा

मेंडगाव प्रकल्प यावरून मेरा, मनुबाई, मेंडगाव, बायगाव बुद्रुक गावासठी सन २०२५-२०२६साठी पिण्याचे आरक्षण मंजूर असताना पाटबंधारे विभागाने परिसरातील अवैधरित्या पाणी घेणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे व पुन्हा जोडणीचे पत्र देण्यात आल्यामुळे पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. त्यातच एकदा अज्ञात व्यक्तीने कालवा गेट उघडल्यामुळे त्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे लाखोंं लिटर्स पाण्याचा अपव्यय झाला आहे. दरम्यान, शेतकरी वर्गाची पिके अंतिम टप्प्यात असल्यामुळे आठ दिवसासाठी वीज जोडणी जोडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती चिखली उपविभागीय अभियंता आकाश शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *