Uncategorized

अंढेरा परिसरात ४४ लाखांचा अफू जप्त; शेतात कांदा बियाण्यांच्या आड सुरू होती लागवड

बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी ‘मिशन परिवर्तन’ ही संकल्पना हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने ३० मार्च २०२६ रोजी अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठी कारवाई केली. धोत्रा नंदई शिवारात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात कांदा बियाण्यांच्या पिकामध्ये बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४४ लाख ५३ हजार २०० रुपये किमतीचा १११.३३ किलो ओला अफू जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि उत्पादन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी आपल्या अधिनस्त पथकांना गोपनीय माहिती काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

३० मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा येथील रहिवासी संजय तुकाराम चेके (वय ५० वर्षे) याने आपल्या धोत्रा नंदई शिवारातील शेतात विनापरवाना अफूची लागवड केली आहे. ही लागवड केवळ स्वतःपुरती मर्यादित नसून, अफूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याने ही झाडे जोपासली असल्याची माहिती समोर आली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धोत्रा नंदई शिवारातील गट नं. ३६८ मध्ये छापा टाकला. पंचांसमक्ष केलेल्या या कारवाईत पोलिसांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. आरोपीने शेतात उभ्या असलेल्या कांदा बियाण्यांच्या पिकामध्ये अत्यंत शिताफीने अफूच्या झाडांची लागवड आणि संगोपन केले होते, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मात्र, पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता, तिथे अफूची झाडे आणि बोंडे आढळून आली. या छाप्यात पोलिसांनी आरोपी संजय तुकाराम चेके याच्या ताब्यातून ओलसर अफूची बोंडे असलेली एकूण वजन १११ किलो ३३ ग्रॅम वजनाची झाडे (किंमत ४४ लाख ५३ हजार २०० रुपये) जप्त केली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध अंढेरा पोलिसांत अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम कलम ८ (क) आणि १८ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. बुलढाणा पोलिसांनी राबविलेल्या ‘मिशन परिवर्तन’ मुळे जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *