खळबळजनक: मलकापुरातून विवाहिता दीड लाखांची रोकड आणि दागिन्यांसह बेपत्ता!
अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर शहरात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, मालवीपुरा (जवाई नगर) भागातील एक ३० वर्षीय विवाहिता घरातून कोणालाही काहीही न सांगता गूढरीत्या बेपत्ता झाली आहे. विशेष म्हणजे, संबंधित महिला सोबत १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि अंगावरील ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मलकापूर शहरातील मालवीपुरा, जवाई नगर येथील रहिवासी असलेले सरवर खान शरीफ खान (वय ३९ वर्षे) हे व्यवसायाने खाजगी वाहन चालक आहेत. ३० मार्च २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी नाजीया फिरदोस सरवर खान (वय ३० वर्षे) ही घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. सायंकाळ होऊनही ती घरी न परतल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले. नातेवाईक, मित्रपरिवार आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र शोध घेऊनही नाजीयाचा कुठेही पत्ता लागला नाही.
या प्रकरणी सरवर खान यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे, पोलीस अंमलदार मोहम्मद रिजवान हे करीत आहेत. मलकापूर शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी होतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मोठी रोकड आणि दागिने सोबत!
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बेपत्ता नाजीया फिरदोस ही जाताना घरात असलेली १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि अंगावर ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (ज्यात गळ्यातील दोन सोन्याच्या पोतचा समावेश आहे) घेऊन गेली आहे. एवढी मोठी रक्कम आणि दागिने सोबत असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ती स्वतःहून गेली की तिला कोणी फुस लावून नेले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

