क्राईम जगत

चिखली, मिसाळवाडी आणि हिवरखेडमधून पुन्हा तीन जण बेपत्ता

अजय टप 
मलकापूर, (प्रतिनिधी): जिल्ह्यातून तरुण मुले आणि मुली बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. मलकापूर येथून विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच चिखली आणि हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक २४ वर्षीय युवक आणि एक २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
चिखली-घरातून निघालेला ऋषिकेश अद्याप बेपत्ता
चिखली येथील राऊतवाडी परिसरातून ऋषिकेश साडू काकफळे (वय २४ वर्षे) रा. चांडोळ हा तरुण २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेला, तो अद्याप घरी परतलेला नाही. त्याची आई सरीता सांडु काकफळे यांनी नातेवाईक आणि परिसरात शोध घेतला, मात्र ऋषिकेशचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर ३१ मार्च रोजी त्यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. त्याचा रंग सावळा, उंची साडेपाच फूट आणि सडपातळ बांधा आहे. पुढील तपास महिला पोलीस अंमलदार सूर्यकला मस्के ह्या करीत आहेत.
हिवरखेड-नातेवाईकांकडे झोपायला गेलेली तरुणी गायब
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत वझर (ता.खामगाव) येथील अम्रपाली विठ्ठल वाकोडे (वय २२ वर्षे) ही तरुणी संशयास्पद रित्या बेपत्ता झाली आहे. ३० मार्च रोजी रात्री ती नेहमीप्रमाणे शेजारील नातेवाईकांकडे झोपण्यासाठी गेली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. नातेवाईकांकडे शोधाशोध करूनही ती मिळून आली नाही. या प्रकरणी तिची आई कल्पना वाकोडे यांच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. तिचा रंग गोरा, उंची ५ फूट २ इंच, अंगात काळ्या-पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळी लेगिंग्स. अंगावर सोन्याचे दागिने (कानातील गुढे, नथ) आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार विलास साखरे हे करीत आहेत.
मिसाळवाडीतून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील एक १८ वर्षीय तरुणी संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये मिसींग दाखल करण्यात आली आहे.
मिसळवाडी येथील रहिवासी भीमराव ओमकार शिनगारे (वय ४५ वर्षे) यांची मुलगी पायल भीमराव शिनगारे (वय १८ वर्षे) ही ३० मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ‘गच्चीवर झोपायला जाते’ असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, त्यानंतर ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी सर्व नातेवाईकांकडे आणि परिसरात तिचा शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. या प्रकरणी अंढेरा पोलिसांत ३१ मार्च रोजी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सोनकांबळे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *