क्राईम जगत

देशी बनावटीचे पिस्तुल अन् जिवंत काडतुसांसह तिघांना ठोकल्या बेड्या!

बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जळगाव जामोद शहरात देशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्तुल) आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तीन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जळगाव जामोद शहरातील ‘श्रीमंत धाब्या’च्या मागे काही तरुण संशयास्पद रित्या वावरत असून, त्यांच्याकडे घातक अग्निशस्त्र असल्याची माहिती आज १ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी तातडीने पथकाला पाचारण करून कारवाईचे आदेश दिले.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पीएसआय अविनाश जयभाये, पोलीस अंमलदार दिपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, महिला पोलीस अंमलदार आशा मोरे आणि तांत्रिक विभागाचे राजू आडवे यांच्या पथकाने सापळा रचला. श्रीमंत धाब्याच्या मागील परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी संशयास्पद मोटारसायकल दिसताच तिला घेराव घातला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने पवन इंदरसिंग डावर (वय २३ वर्षे, रा. राजुरा बुद्रुक), संजय भिलासिंग बोडल (वय २० वर्षे, रा. राजुरा बुद्रुक) आणि रमेश दुर्गासिंग बारेला (वय २४ वर्षे, रा. इस्लामपूर) या तिघांनाही जागीच झडप घालून ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल (किंमत ४० हजार रुपये) आणि दोन जिवंत काडतूस (किंमत २ हजार रुपये) आढळून आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल (किंमत ८० हजार रुपये) असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांत उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार करड्याचे (आर्म्स ॲक्ट) कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२३, १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हे शस्त्र त्यांनी कोठून आणले आणि त्यांचा पुढील इरादा काय होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुन्हेगारांनी कितीही सावधगिरी बाळगली तरी पोलीस त्यांच्या मुसक्या आवळण्यास समर्थ आहेत, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *