क्राईम जगत

धक्कादायक: शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण

संग्रामपूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी दुकानावर बसलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याची घटना ३१ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी वाशिम येथील एका तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पहुरजिरा (ता.शेगाव) येथील रहिवासी असलेले ४३ वर्षीय इसम हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे पहुरजिरा गावातच एक ‘डेली नीड्स’चे छोटे दुकान आहे. ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. त्यांची धाकटी मुलगी (वय १५ वर्ष ९ महिने) ही सकाळी ९ वाजेच्या सुमारास वडिलांना मदत म्हणून दुकानावर बसली होती. काही वेळानंतर वडिलांना त्यांच्या मुलीचा फोन आला आणि तिने त्यांना दुकानावर बोलावले. मात्र, जेव्हा ते दुकानावर पोहोचले, तेव्हा त्यांना आपली मुलगी तिथे दिसून आली नाही. सुरुवातीला ती घराकडे गेली असावी किंवा कोणा मैत्रिणीकडे गेली असावी, असा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला. मात्र, काही वेळातच त्यांच्या मोठ्या मुलीचा फोन आला आणि तिने विचारले की “बहिणीला घरी पाठवा.” तेव्हा वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने सांगितले की ती दुकानावर नाही.
मुलगी बेपत्ता असल्याचे समजताच कुटुंबीयांनी गावातील आजूबाजूच्या परिसरात, बस स्थानक आणि नातेवाईकांकडे तिची शोधाशोध सुरू केली. मात्र, तिचा कोठेही पत्ता लागत नव्हता. शोध सुरू असतानाच फिर्यादीला त्यांच्या मावस साल्याचा त्यांना फोन आला. या फोन कॉलमुळे या प्रकरणातील गूढ उकलले. मावस साल्याने माहिती दिली की, तुमच्या मुलीला वैभव दिलीप उगले (रा. वाशिम) याने पळवून नेले आहे. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी जलंब पोलीस स्टेशन गाठले.
या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुक पोलिसांनी आरोपी वैभव दिलीप उगले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे हे करीत आहेत. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून होणारी ओळख अशा प्रकारच्या घटनांना कारणीभूत ठरत असल्याचे काही जाणकारांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *