बुलढाणा जिल्ह्यात चार जणांच्या मृत्यूंनी उडाली खळबळ
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत मृत्यूच्या चार धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा उंचावरून पडून मृत्यू झाला आहे, तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. इतर दोन घटनांमध्ये मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
तारापूर येथील ४२ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली. तारापूर (पोस्ट कोथळी) येथील रहिवासी बजेशींग ईश्वरसींग चव्हाण (वय ४२ वर्षे) यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १ एप्रिल रोजी सकाळी ८.५५ च्या सुमारास त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय (बुलढाणा) येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रॉट डेड’ घोषित केले. या प्रकरणी पोलीस हवालदार राहुल बटटुकार पुढील तपास करत आहेत.
बोरखेडी बावरा येथील १६ वर्षीय मुलीचा उंचावरून पडून मृत्यू
सिंदखेड राजा पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. बोरखेडी बावरा येथील शामल रमेश शेरे (वय १६ वर्षे) ही मुलगी २७ मार्च रोजी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली होती. गंभीर जखमी अवस्थेत तिला जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २९ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अंमलदार संजय डोंगरदिवे तपास करत आहेत.
राजूर येथील ३८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू
बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत राजूर येथील सय्यद अजिम सय्यद अनवर (वय ३८ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. २५ मार्च रोजी त्यांना बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार बळीराम खंडागळे करत आहेत.
शेगाव येथील बालाजी टावरमध्ये आकस्मिक मृत्यू
शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत धनोकार कम्पाउंड येथील प्रवीण बबनराव शेंडगे (वय ४३ वर्षे) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. १ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी त्यांना मृत अवस्थेत शेगावच्या रुग्णालयात आणले होते. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुरेंद्रसिंग चव्हाण यांनी मर्ग दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.
वरील सर्व घटनांमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १९४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला असून, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

