अकोला

मूर्तिजापूर : भरधाव दुचाकीचा अपघात; एक ठार, एक गंभीर

पुष्कर मानकर

अकोला, (प्रतिनिधी): मूर्तिजापूर शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसर आज भीषण अपघाताने हादरला असून या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतकाचे नाव शरद डोंगरे (वय ४०) असे असून रमेश जामनिक (वय ६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही टीपटाळा येथील रहिवासी आहेत. वाई येथे सोयरिक कार्यक्रम आटोपून परत येत असताना हा अपघात घडला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात आठवडी बाजाराकडून बायपासकडे वाहतुकीची मोठी वर्दळ होती. त्याचवेळी डोंगरे आणि जामनिक दुचाकीने समोरून येत असताना अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट विद्युत खांबावर आदळली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.

अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शरद डोंगरे यांना मृत घोषित केले. रमेश जामनिक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *