क्राईम जगत

गारडगावच्या प्रभारी लाचखोर ग्रामसेवकास पकडले खामगाव पंचायत समितीत एसीबीची कारवाई

खामगाव,(प्रतिनिधी): गावठाण शेतातील जमिनीची नमुना ८ ‘अ’ची नोंद रद्द करून दुरुस्ती अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास एसीबीच्या पथकाने अटक केली. खामगाव पंचायत समिती कार्यालयात २ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर भ्रष्ट ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
विजय माधव गवई (वय ४२) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. तालुक्यातील पारखेड येथील ग्रामपंचायतीत हा ग्रामसेवक नियमित कार्यरत आहे. त्याच्याकडे गारडगाव येथील अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. मात्र, त्याने आपल्या पदाचा दुरुपयोग लाचखोरीसाठी केला. गारडगाव येथील तक्रारदारकर्त्याची गावाबाहेर गावठाण शेतात जागा आहे. या जागेची ‘नमुना ८-अ’ची नोंद रद्द करून त्यामध्ये दुरुस्ती करून तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी विजय गवईने ३० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दहा हजार रुपये घेण्याचे ठरले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करताच सापळा रचण्यात आला. आधी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपीने लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे समोर आले. २ एप्रिल रोजी एसीबीच्या पथकाने खामगाव पंचायत समितीतच लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास अटक केली. पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे यांच्या नेतृत्वात दीपक जाधव, जगदिश पवार, रणजित व्यवहारे, शैलेश सोनवणे, नितीन शेटे, अर्शद शेख यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *