जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा
अभिनय बोर्डे
धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले अजिंठा (ता.सिल्लोड) हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, याच पर्यटन क्षेत्राचा फायदा घेत काही समाजकंटक अनैतिक व्यवसायांची जाळी पसरवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने बाळपूर येथील ‘हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट अँड बिअर बार’वर छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ तरुणींची सुटका केली असून दोन आरोपींना अटक केली आहे.
अजिंठा लेणी परिसरातील बाळपूर येथील हॉटेल अभिमन्यूमध्ये मोठ्या प्रमाणावर अनैतिक व्यवसाय सुरू होता. ही माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. १ एप्रिलच्या रात्री सव्वा नऊच्या सुमारास पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. तेथे देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची खात्री पटताच, छत्रपती संभाजीनगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर व त्यांच्या पथकाने तातडीने हॉटेलवर ‘हल्लाबोल’ केला. या कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रफिक खान अजमेर खान (वय ३५ वर्षे) रा. अजिंठा) आणि आजिनाथ प्रभू लोखंडे (वय २५ वर्षे) रा. अजिंठा याचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल फोन आणि रोख रक्कम, असा एकूण २२ हजार ५०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीची कारवाईदेखील सरला गाडेकर यांनीच यशस्वी केली होती.
पीडित तरुणींची सुटका
पोलिसांनी या नरकयातनेतून तीन तरुणींची यशस्वीरीत्या सुटका केली. यामध्ये पश्चिम बंगालमधील १ आणि महाराष्ट्रातील २ अशा तीन तरुणींचा समावेश आहे. या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून किंवा अन्य कारणांनी या व्यवसायात ओढले गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुनरावृत्तीमुळे संताप: एकाच हॉटेलवर दुसऱ्यांदा कारवाई
धक्कादायक बाब म्हणजे, याच हॉटेलवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षी १८ मे रोजी सुद्धा धाड टाकली होती. त्यावेळीही ३ तरुणींची सुटका करण्यात आली होती. विशेष म्हणजे, गेल्या वेळी ज्या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती, त्याच दोघांना याही वेळी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. कायद्याचा धाक उरला नसल्यामुळे या हॉटेलमध्ये पुन्हा पुन्हा हे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पर्यटन क्षेत्राला अनैतिकतेचा डाग
अजिंठा लेणी हे जागतिक वारसास्थळ असून, येथे देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने येतात. येथे नेहमीच गर्दी असते. याच गर्दीचा आणि पर्यटनाचा गैरफायदा घेऊन ‘आंबट शौकीनांना’ आकर्षित करण्यासाठी हे रॅकेट चालवले जात होते. अशा प्रकारांमुळे जागतिक कीर्तीच्या या पर्यटन स्थळाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.