बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या बेपत्ता आणि अपहरणाच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. चिखली, बुलढाणा शहर, बोराखेडी, जळगाव जामोद आणि मेहकर या पाच वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एकूण ५ व्यक्ती बेपत्ता झाल्या असून, यामध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील महिला आणि तरुण मुलींच्या सुरक्षिततेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मेहकरमध्ये खळबळ: १५ वर्षीय मुलीचे भरदिवसा अपहरण!
सर्वात धक्कादायक घटना मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आली आहे. लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील जनार्धन खरात यांची १५ वर्षीय मुलगी ‘पायल’ ही सुलतानपूर येथील क्लासेसला गेली असताना, कोणीतरी अज्ञात नराधमाने तिला फूस लावून पळवून नेले. ही घटना १ एप्रिल रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल केला असून सपोनी विनोद नरवाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. क्लासेसला गेलेल्या मुली सुरक्षित नाहीत का? असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत.
चिखलीतून विवाहिता बेपत्ता: तहसील कार्यालयासमोरूनच झाली गायब!
दुसरी घटना चिखली शहरात घडली आहे. तहसील कार्यालयासमोर राहणारे सुनील किसन कांबळे यांची ३० वर्षीय पत्नी ‘कविता’ ही ३० मार्च रोजी सकाळी ७ वाजेपासून घरातून निघून गेली आहे. नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेऊनही तिचा पत्ता लागलेला नाही. तहसील कार्यालयासारख्या गजबजलेल्या परिसराजवळून एखादी महिला अशा प्रकारे बेपत्ता होणे, ही चिंतेची बाब बनली आहे.
बोराखेडी: माय-लेकीचा शोध अद्याप सुरूच!
मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथून २३ वर्षीय विवाहिता प्रियंका अरुण गाडेकर ही आपल्या ४ वर्षांच्या चिमुरड्या मुलीला (प्रज्ञा) सोबत घेऊन घराबाहेर पडली ती परतलीच नाही. १ एप्रिलच्या सायंकाळी ही घटना घडली. पती अरुण गाडेकर यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. एका लहान मुलीसह महिला बेपत्ता झाल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कसून शोध घेतला जात आहे.
शेवाळे हॉस्पिटलमधून ‘वेडसर’ तरुणी गायब; बुलढाणा पोलीस सतर्क!
बुलढाणा शहरात उपचारासाठी आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मोताळा तालुक्यातील तालखेड येथील निशा प्रल्हाद पाचपोर हिला तिच्या आईने उपचारासाठी बुलढाणा येथील शेवाळे हॉस्पिटलमध्ये आणले होते. निशाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा फायदा घेत ती कोणालाही न सांगता तिथून निघून गेली. पोलीस हेवी सर्च ऑपरेशन राबवत असून तपास अधिकारी संजीव जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
जळगाव जामोदमध्ये तरुण बेपत्ता; कुटुंबाची डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा!
केवळ महिलाच नव्हे, तर तरुण मुलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढत आहे. जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील २२ वर्षीय युवक सुपडा शिवराम भगत हा १ एप्रिल रोजी सकाळी ‘कुठेतरी जातो’ असे सांगून घरातून निघाला. अंगात हिरवा टी-शर्ट आणि निळी पॅन्ट असलेल्या या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे.
एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या ५ घटनांमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर आता दबाव वाढला आहे. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात आरोपींचा तात्काळ शोध लावण्याची मागणी होत आहे. कोणत्याही व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस स्टेशन किंवा तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आहे. जिल्ह्यातील या वाढत्या घटनांमुळे दहशतीचे वातावरण असून, आता ‘दोषींवर कठोर कारवाई कधी होणार?’ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

