क्राईम जगत

खळबळजनक: बुलढाणा ठाण्यातच पोलिसाला मारहाण

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): शहरातील पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी अक्षय सुधाकर कांबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास, बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शशिकांत प्र. धारकरी (वय ५७ वर्षे) हे गणवेशात स्टेशन डायरीवर कर्तव्यावर हजर होते. यावेळी आरोपी अक्षय कांबळे हा पोलीस ठाण्याच्या आवारातच आपल्या पत्नीला मारहाण करत होता.

हे पाहून फिर्यादी धारकरी यांनी त्याला मारहाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने शासकीय लोकसेवक असलेल्या धारकरी यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखले. आरोपीने त्यांना धाक दाखवून इच्छापूर्वक दुखापत केली आणि स्टेशन डायरीच्या टेबलवरील रजिस्टर व कागदपत्रांची फेकाफेक केली.

शासकीय कामात अडथळा आणि धमकी

आरोपीने केवळ मारहाणच केली नाही, तर पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवाने मारण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शशिकांत धारकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी अक्षय सुधाकर कांबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१(१), १३२, ३५१(३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *