क्राईम जगत

जुन्या वादातून शेजाऱ्यांकडून मजुराला कुऱ्हाडीने मारहाण

अजय टप

खामगाव, (प्रतिनिधी): शहरातील शिवाजी वेस, भोईपुरा भागात किरकोळ कारणावरून जुन्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत एका ५२ वर्षीय मजुरावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले असून, शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनोहर सखाराम केळोदे (५२) आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू आहेत. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, फिर्यादीने आपल्या घरासमोर ठेवलेले दोन बांबू काढून टीनपत्र्यावर टाकले. याच कारणावरून आरोपींनी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार विक्की प्रकाश सुर्यवंशी, रुपेश प्रकाश सुर्यवंशी आणि प्रकाश पांडुरंग सुर्यवंशी यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या दरम्यान, विक्की सुर्यवंशी याने फिर्यादीच्याच घरातील लोखंडी कुऱ्हाड आणून त्यांच्या कपाळावर वार केला. रुपेश सुर्यवंशी याने फिर्यादीला ओढत नेल्यामुळे त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. चौथा आरोपी अतिश श्रीनाथ यानेही फिर्यादीला पकडून ठेवत मारहाण करण्यास मदत केली. मारहाण केल्यानंतर “जर पुन्हा येथे दिसलास, तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी विक्की आणि रुपेश सुर्यवंशी यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी मनोहर केळोदे यांना तातडीने सामान्य रुग्णालय (खामगाव) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(१), ११५(२), ३५२(२),३५३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस अंमलदार संगिता आगरकर ह्या करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *