क्राईम जगत

सावधान! ‘चेकिंग’च्या बहाण्याने लोणार परिसरात वृद्धाची फसवणूक

अजय टप
लोणार (प्रतिनिधी): रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना गाठून ‘आम्ही चेकिंगवाले आहोत’ असे भासवून दागिने लंपास करणाऱ्या टोळीने आता लोणार परिसरात धुमाकूळ घातला आहे. लोणार ते मंठा रोडवरील पार्डा पाटीजवळ एका ६५ वर्षीय वृद्धाला गाठून दोन अज्ञात भामट्यांनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातचालाखीने लंपास केल्याची घटना घडली.
अजिसपूर (ता. लोणार) येथील रहिवासी विठोबा ग्यानबा कुलाल (वय ६५) हे आपल्या मोटारसायकलने लोणारकडे जात होते. ते पार्डा पाटीजवळ आले असता, पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना आवाज देऊन थांबवले. “आम्ही चेकिंगवाले आहोत, सध्या सोने घालून फिरता येत नाही, तुमच्या हातातील अंगठी काढून ठेवा” असे म्हणत विश्वासात घेतले. विठोबा कुलाल यांनी आपल्या बोटातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढली. आरोपींनी ती अंगठी हातात घेतली आणि नजर चुकवून त्याऐवजी एक ‘डुप्लिकेट’ अंगठी कागदात गुंडाळून फिर्यादीच्या पिशवीत टाकली. “ही अंगठी आता बाहेर काढू नका” असे सांगून आरोपी तिथून पसार झाले. घरी जाऊन पाहिले असता, आपली खरी अंगठी चोरीला गेल्याचे आणि पिशवीत बनावट अंगठी असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
या प्रकरणी विठोबा कुलाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम ३१८ (४), ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गजानन सानप हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि मौल्यवान दागिने जपून ठेवावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *