स्मार्ट बुलढाणा

चिमुरड्या विद्यार्थ्यांनी दप्तर सोडून गिरवले ‘दरबारी’ धडे!

सिंदखेड राजा,(प्रतिनिधी) :

शेलगाव राऊत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळांना भेट न देता थेट तहसील कार्यालय, शिक्षण विभाग आणि पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले. शाळेच्या शिक्षकांनी आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने हा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या अवघ्या २५ चिमुरड्यांनी महसूल विभागाच्या कामाचा अनुभव घेतला. नॉन-क्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र, अधिवास (डोमिसाईल) आणि उत्पन्न प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया काय असते, याचे जिवंत प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पाहिले. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि कुतूहल दिसून आले. विद्यार्थ्यांची ही जिज्ञासू वृत्ती पाहून तहसीलदार अजित दिवटे भारावून गेले. त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना ‘लेटर बुक आणि पेन’ भेट दिले. निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार, डॉ. प्रवीण वराडे, रामेश्वर काळे यांच्यासह महसूलच्या संपूर्ण चमूने विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाची सविस्तर माहिती दिली. ही नाविन्यपूर्ण सहल यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख पंढरीनाथ बुरकुल, शिक्षक नंदकिशोर नीलम, शाळा समिती उपाध्यक्ष मनीषा राऊत, माता लीडर कल्पना पवार आणि पालक कौतिकराव राऊत यांनी पुढाकार घेतला. या सहलीच्या निमित्ताने महसूल संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय सोनुणे, नागेश खरात यांच्यासह महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

उपक्रम कौतुकास्पद

शासकीय कार्यालय कसे असते आणि तिथे लोकांची कामे कशी होतात, हे मुलांना इतक्या लहान वयात कळणे ही काळाची गरज आहे. शेलगाव राऊत शाळेचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून इतर शाळांनीही असाच आदर्श घ्यावा, असे यावेळी तहसीलदार दिवटे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *