मुंबई,(प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला कमालीचा वेग आला आहे. मतमोजणीदरम्यान कुठे शांतता, तर कुठे राडा झाल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याचे दिसून आले. अंबानगरी अर्थात अमरावतीमध्येही तणावाचे वातावरण आहे.
अमरावतीच्या सुतगिरणी प्रभागात मतमोजणी सुरू असताना आमने- सामने आलेल्या दोन गटांत जोरदार वाद आणि त्यानंतर राडा झाल्याचे दिसून आले. मतमोजणी केंद्रावर तणाव वाढल्याने प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वादामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने पोलीस व दोबसतात वाढ करण्यात आली आहे.
दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतनगरीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीच्या लढतीचे मजेदार चित्र पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजप+शिंदे गटाने तब्बल १०९ जागांवर आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ६७ जागांवर आघाडी घेतली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११ तर इतर ७ जागांवर आघाडीवर आहे.
सोलापूरमधे भाजप ५२ जागांसह आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे) अनुक्रमे ४ आणि ७ जागांवर आहेत. मविआला येथे सध्या ७ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेत भाजप २६ जागांसह पहिल्या क्रमांकावर असून शिवसेनेच्या दोन्ही गटांत चुरस दिसून येत आहे.

Leave a comment