क्राईम जगत

बेपत्ता व्यक्तीचा शेतात आढळला सांगाडा

नांदुरा,(प्रतिनिधी): लोणवडी (ता.नांदुरा) येथून मागील पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज १७ जानेवारी रोजी एका शेतात आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाजी ज्ञानदेव फासे, असे मृतकाचे नाव असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र समोर आले नाही.
नांदुरा तालुक्यात येणाऱ्या लोणवडी येथील रहिवासी असलेला शिवाजी ज्ञानदेव फासे (वय ३८ वर्षे) हा २ जानेवारी रोजी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी नांदुरा पोलीस स्टेशन गाठून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी हरवल्याची नोंद घेतली होती.
दरम्यान, आज १७ जानेवारी रोजी संतोष महादेव फासे यांच्या बेलाचा मळा नामक गट क्रमांक १७६ मधील शेतात तूर सोंगणीचे काम करणाऱ्या एका मजुरास अचानक एका मानवी सांगाडा आणि मृतदेह दिसून आला. घाबरलेल्या मजुरांनी तात्काळ ही माहिती शेतमालकास दिली. शेतमालक संतोष फासे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विदारक अवस्था झालेल्या मृतदेहाची त्याच्या अंगावरील कपड्यांवरून ओळख पटवत सदर मृतदेह बेपत्ता असलेल्या शिवाजी ज्ञानदेव फासे याचाच असल्याची त्यांना खात्री पटली. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
या प्रकरणी संतोष फासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांत भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १९४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक सोळंके हे करत आहेत. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय? मृत्यू अपघातामुळे झाला, की त्याचा कोणी घात केला?याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे लोणवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *