स्मार्ट बुलढाणा

हृदयद्रावक: पोकलॅण्ड खाली दबून चालकाचा जागीच मृत्यू

अजय टप
नांदुरा (प्रतिनिधी): डिझेल चोरीच्या भीतीने मशीनमध्येच झोपणे एका २४ वर्षीय तरुणाच्या चांगलेच जीवावर बेतले. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा जिगाव धरण प्रकल्पाच्या कामावर पोकलॅण्ड खाली दबून एका तरुण पोकलॅण्ड चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी १०.४० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मध्य प्रदेशातील चंद्रेह, (जि.सिंगरौली) येथील रहिवासी असलेला राकेशसिंह जमारसिंह गोंड (वय २४ वर्षे) हा जिगाव धरण प्रकल्पावर पोकलॅण्ड चालक म्हणून कार्यरत होता. प्रकल्पाच्या ठिकाणी उभी असलेली यंत्रसामग्री आणि त्यातील डिझेल चोरीला जाऊ नये, या उद्देशाने राकेशसिंह शुक्रवारी, २३ जानेवारीच्या रात्री पोकलॅण्डच्या कॅबिनमध्येच झोपला होता. विशेष म्हणजे हे पोकलॅण्ड मशीन मातीच्या एका उंच ढीगाऱ्यावर उभे करण्यात आले होते.
शनिवारी, २४ जानेवारीच्या सकाळी या भागातून अन्य अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ झाली. त्यामुळे मातीच्या ढीगाऱ्याची स्थिरता बिघडली आणि उभी असलेली पोकलॅण्ड अचानक खाली कोसळली. या भीषण अपघातात कॅबिनमध्ये झोपलेला राकेशसिंह मशीनखाली दबला गेला. यामध्ये त्याच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्याच्या सहकारी कामगारांनी तातडीने त्याला मशीनच्या खालून बाहेर काढले. तसेच तत्काळ नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण जयस्वाल यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे परिचर वैभव संजय पवार यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या मेमोवरुण पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाटोळ यांच्या मार्गदर्शनात नांदुरा पोलीस करीत आहेत. एका तरुण कामगाराच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *