मलकापूरच्या नर्सिंग कॉलेजकडून विद्यार्थिनींची फसवणूक
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शैक्षणिक फी भरून आणि शासनाची शिष्यवृत्ती जमा होऊनही स्थानिक आरएएनएम नर्सिंग कॉलेज प्रशासनाकडून गुणपत्रिका व मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी केला आहे. नव्हेतर कॉलेज प्रशासनाकडून आपली फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत तब्बल १२ विद्यार्थिनींनी न्यायासाठी मलकापूर शहर पोलिसांत धाव घेतली आहे. त्यामुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
स्थानिक आरएएनएम नर्सिंग कॉलेजमध्ये सुमारे ५० ते ६० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. यातील तक्रारदार विद्यार्थिनींनी तत्कालीन मुख्याध्यापक पवन भगवान मानकर यांच्याकडे दरवर्षी ३४ हजार ४०० रुपये याप्रमाणे दोन वर्षांची एकूण ६८ हजार ८०० रुपये शैक्षणिक फी रोख स्वरूपात तसेच काहींनी “फोन पे”द्वारे जमा केली. आता विद्यार्थिनींचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून परीक्षेचा निकालही लागला आहे. मात्र, निकाल लागूनही कॉलेज प्रशासन विद्यार्थिनींना त्यांचे पास झाल्याचे प्रमाणपत्र आणि प्रवेशाच्या वेळी जमा केलेली १० वी व १२ वीची मूळ कागदपत्रे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
या संदर्भात विद्यार्थिनींनी मलकापूर शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, स्वतःची फी पूर्ण भरलेली असतानाही, महाराष्ट्र शासनाकडून त्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम देखील कॉलेजने स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. फी भरून आणि शिष्यवृत्तीचे पैसे मिळूनही कॉलेज प्रशासन कागदपत्रे अडवून ठेवत असल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत असून आमची फसवणूक करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील संघमित्रा अशोक गवई, ऋषाली अरूण इंगळे, प्रांजल राजेंद्र सुर्यवंशी, निकीता वसंता इंगळे, अर्पिता संजय पवार, प्रणाली गणेश इंगळे, योगिता संजय तांबे, प्रियंका सुनिल खंडारे, प्रिती प्रविण शिरसाट, नेहा गजानन धुरंधर, शुभांगी सोपान पवार यांच्यासह अन्य विद्यार्थिनींनी केली आहे. या प्रकरणामुळे मलकापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करतात,याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

