स्मार्ट बुलढाणा

बिगुल वाजला! बुधवारपासून पोलीस भरतीची शारीरिक चाचणी

सुभाष मोहिते
बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्हा पोलीस दलात १४८ पोलीस शिपाई आणि १४ पोलीस चालक शिपाई, अशा एकूण १६२ जागा रिक्त आहे. रिक्त जागांची भरती प्रक्रियेला बुधवार, ११ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथील कवायत मैदानावर शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी पार पडणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे.
बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील १६२ जागांच्या भरतीसाठी प्रशासनाकडे एकूण १४ हजार २५३ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी ८ हजार १४० तर चालक पदासाठी ६ हजार ११३ उमेदवारांचा समावेश आहे. या पदाच्या भरतीसाठी ११ ते २१ फेब्रुवारी दरम्यान पोलीस शिपाई भरतीसाठी तर २६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान पोलीस चालक शिपाई चाचणी घेण्यात येणार आहे. सकाळी पाच वाजतापासून चाचणीला सुरुवात होणार आहे. या मैदानी चाचणीला येतांना उमेदवारांनी मूळ आवेदन अर्ज व प्रवेश पत्र, आवेदन अर्जावरील फोटोसारखेच दोन पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड), सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मूळ प्रती आणि दोन संच छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.बाहेरगावावरुन येणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी सबसिडीअरी कँटीन (बुलढाणा), तर महिला उमेदवारांसाठी दिपक जोग विश्रामगृह (बुलढाणा) येथे राहण्याची व्यवस्था जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. उमेदवारांना काही अडचण असल्यास कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक पावरा, बुलढाणा ठाणेदार रवि राठोड, तसेच पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चाचणीचे निकाल दररोज संध्याकाळी पोलीस मुख्यालयातील सूचना फलकावर आणि बुलढाणा पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर भर

भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी, यासाठी प्रत्येक टप्प्यावर व्हिडिओ शूटिंग आणि देखरेख असणार आहे. उमेदवारांना मैदानावर मोबाईल, स्मार्ट वॉच किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास सक्त मनाई आहे. विशेष म्हणजे, उमेदवारांना चाचणी दरम्यान सामान्य स्पोर्ट्स शूज वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र ‘स्पाइक शूज’ वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या कौशल्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *