बुलढाणा, (प्रतिनिधी) : रात्रच नाही तर दिवसही चोरट्यांचा असल्याचा प्रत्यय नुकताच बुलढाणा शहरवासीयांना आला. शहराच्या गजबजलेल्या शिक्षक कॉलनी परिसरात असलेल्या निर्मिती अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यानी भरदिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील शिक्षक कॉलनी समता नगरपाती जवळ निर्मिती नावाचे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये राहणारे उमेश हरीभाऊ शहाणे (वय ३९ वर्षे) यांचा शिलाई मशीन विक्रीचा व्यवसाय आहे. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.१५ ते ४.४५ च्या दरम्यान शहाणे कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर उचकटून त्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत (किंमत ५० हजार रुपये), गजानन महाराजांचे सोन्याचे लॉकेट (किंमत ५ हजार रुपये), सोन्याचे कानातले फुले (किंमत १० हजार रुपये), सोन्याची बास्केट रिंग (किंमत ५ हजार रुपये), चांदीचे कडे (किंमत २ हजार रुपये) आणि १३ हजार रुपये रोख, असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. शहाणे कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी बुलढाणा शहर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार रवी राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर, पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते.
याप्रकरणी उमेश शहाणे यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३३१ (३), ३०५ (अ) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास ठाणेदार रवि राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे हे करत आहेत.
Leave a comment