क्राईम जगत

पोलीस डायरी: अपघाती मृत्यू, चोऱ्या आणि मारहाणीच्या घटनांनी हादरला जिल्हा

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपघाती मृत्यू, चोऱ्या आणि मारहाणीच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. गंभीर गुन्ह्यांच्या या वाढत्या घटनांमुळे मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा आपली शांत,संयमीपणाची ओळख पुसतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

दुचाकीचा अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

लोणार: लोणार तालुक्यातील सोनुना शिवार येथे होंडा शाइन दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात अभय विष्णू हाके या तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मुलाच्या अंत्यविधीनंतर वडिलांनी फिर्याद दिल्याने लोणार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

धरणाच्या पाण्यात बुडून चिमुरड्याचा मृत्यू

अंढेरा: खडकपूर्णा धरणाच्या पाटात बुडून १२ वर्षीय बालकाचा अंत झाला. कोपरगाव येथील स्वराज गणेश खरात हा १२ वर्षांचा मुलगा अंढेरा जवळील अंचरवाडी येथे धरणाच्या पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मलकापुरात चोरीचे सत्र सुरूच

मलकापूर: वर्कशॉपचे कुलूप तोडून ८० हजारांचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली. शहरातील आयटीआय कॉलेजजवळ असलेल्या किस्मत ॲग्रो वेल्डिंग वर्कशॉपमधून अज्ञात चोरांनी ॲल्युमिनियमचे ५ बॅग शेती साहित्य चोरून नेले. पोलिसांनी ‘ई-साक्ष’ नोंदवून तपास सुरू केला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर ‘हिट अँड रन’

नांदुरा: नॅशनल हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नांदुरा ते मलकापूर रोडवरील वडी गावाजवळील पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दीपक खेमचंद आहुजा (वय ४३) यांचा मृत्यू झाला. आरोपी चालक अपघात करून फरार झाला असून नांदुरा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लिफ्ट मागितल्याने मारहाण

अमडापूर: दुचाकीवर लिफ्ट मागितली म्हणून वीट मारून डोके फोडले. लिफ्ट मागितल्याच्या कारणावरून पेठ येथील देशी दारू दुकानासमोर एकाने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केले. बोरगाव काकडे येथील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

९२ हजारांचे दागिने व रोख लंपास

रायपूर: झोपेत असताना घरात शिरला चोरटा, ९२ हजारांचे दागिने व रोख केले लंपास. पिंपळगाव सराई येथे मध्यरात्री अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करून लोखंडी पेट्या चोरून नेल्या. आरडाओरड झाल्याने चोरटा पळून गेला, मात्र सोन्याची अंगठी, पोत आणि रोख रक्कम असा एकूण ९२,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

घाटपुरी येथील महिला आणि मलकापूरचे पती-पत्नी गायब

घाटपुरी (खामगाव): ३३ वर्षीय स्वाती श्रीकृष्ण इंगळे ही महिला १५ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. तर मलकापूर येथील पंचमुखी नगर येथील गजानन ताडे आणि त्यांची पत्नी दीपाली ताडे हे कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले आहेत. यासोबतच मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हायवेवर दुचाकी-कारचा अपघात; कारचे ३ लाखांचे नुकसान, आरोपीच्या नातेवाईकांकडून धमकावल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंढेरा: मेरा खुर्द येथून होंडा शाइन दुचाकीची चोरी; संशयित मुन्ना उर्फ अनिल थुट्टे विरुद्ध गुन्हा दाखल. खामगाव (गंवढाळा): घरात येण्यास मनाई केल्याने महिलेला शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *