क्राईम जगत

पांग्री काटेत उगवला १.३२ कोटींचा अफू

अजय टप

मलकापूर,( प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येणाऱ्या पांग्री काटे शिवारात आरोपींनी चक्क शेतामध्ये गांजाची लागवड करून कोट्यवधींची कमाई करण्याचा घाट घातला. मात्र, दोन्ही आरोपी शेतकऱ्यांचा डाव मेहकर पोलिसांनी उधळून लावला. या धाडसी कारवाईत १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथक १६ फेब्रुवारीच्या रात्री गस्तीवर होते. यावेळी पांग्री काटे येथील काही शेतात बेकायदेशीररीत्या अफूची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती या पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ संतोष खाडे, एपीआय गजानन करेवाड, पीएसआय गणेश कड, महसूल विभागाचे कर्मचारी, फॉरेन्सिक पथक तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचा समावेश असलेल्या पथकाने विलंब न लावता महसूल आणि फॉरेन्सिक टीमला सोबत घेऊन पांग्री काटे शिवारातील गट नंबर १४८ आणि १५८ मध्ये तपासणी केली असता, तेथे अफूची पिके डोलताना दिसली. ही बेकायदेशीर शेती पाहून पोलीस अधिकारीही अवाक झाले. या कारवाईत भागवत सदाशिव काटे याच्या शेतातून १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाची अफूची झाडे (किंमत ८६ लाख १२ हजार ८०० रुपये) जप्त करण्यात आली. तर विशाल रमेश काटे याच्या ताब्यातून ५७ किलो ३२० ग्रॅम वजनाची झाडे (किंमत ४५ लाख ८५ हजार ६०० रुपये), असा एकूण १ कोटी ३२ लाख रुपये किमतीची अफूची झाडे आणि बोंडे पोलिसांनी जप्त केली.

या प्रकरणी पोलिसांनी भागवत सदाशिव काटे आणि विशाल रमेश काटे या दोन्ही शेतकऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांत अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रॅकेट फक्त या दोन शेतकऱ्यांपुरते मर्यादित आहे की याचे धागेदोरे आंतरराज्य टोळ्यांशी जोडलेले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *