क्राईम जगत

लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : एका २१ वर्षीय तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता मुलीचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करून तिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही खळबळजनक घटना मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथे उघडकीस आली. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा तालुक्यातील सारोळा मारुती येथील रहिवासी असलेली पिडीत मुलगी (वय १६ वर्षे) ही सध्या शिक्षण घेत आहे. तर यातील आरोपी कृष्णा निना व्यवहारे (वय २१ वर्षे) हा याच गावाचा रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी कृष्णा पिडीत मुलीचा पाठलाग करत होता. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याने पीडितेचा हात धरून तिला बळजबरीने गावातील महादेव मंदिरात नेले आणि तिथे तिच्यासोबत फोटो काढले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिचा वाईट उद्देशाने हात धरला आणि “जर तू माझ्याशी लग्न केले नाहीस, तर तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन आणि स्वतःही फाशी घेऊन आत्महत्या करेन,” अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने पीडितेचा बळजबरीने काढलेला फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम आयडीवर पोस्ट केला. त्यावर त्याने “महाशिवरात्री मध्ये उपवास मी ठेवणार, पण मागणार तुलाच”, असा मजकूरही लिहिला. हा फोटो पीडितेच्या भावाने इंस्टाग्रामवर पाहिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पीडितेने धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कृष्णा निना व्यवहारे (वय २१ वर्षे) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७५ (१) (आय), ७८, ३३३, ३५१ (२), ३५१ (३) सह कलम ८, १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *