क्राईम जगत

मलकापूर ग्रामीणमधून महावितरणच्या डीपीवरील ४० हजारांची तार चोरी

अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दाताळा शिवारातून अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या दोन डीपींवरील तब्बल ३००० मीटर लांबीची ॲल्युमिनियम तार लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर तालुक्यात येणाऱ्या दाताळा शिवारात महावितरण कंपनीची वीज पुरवठा करणारी डीपी आहे. १५ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री १० वाजेपासून ते १६ फेब्रुवारी २०२६ च्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान गावकरी आणि शेतकरी झोपेत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा दाताळा शिवारातील शेतात वळवला. या भागातील पी.आर. मास्तर डीपी आणि श्रीराम डीपी, या दोन ठिकाणच्या वीज यंत्रणेला लक्ष्य करून दोन्ही डीपींवरील एकूण १५ गाळे, म्हणजेच अंदाजे ३००० मीटर लांबीची LT विद्युत ॲल्युमिनियम तार (किंमत ४० हजार रुपये) कापून चोरून नेली. सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्याने तार चोरीला गेल्याचे निदर्शनास आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
या प्रकरणी महावितरणच्या दाताळा वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू टाकरखेडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *