Home क्राईम जगत खामगाव हादरले! सख्ख्या भावाचा गेम करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
क्राईम जगत

खामगाव हादरले! सख्ख्या भावाचा गेम करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक अत्यंत थरारक घटना खामगाव तालुक्यातील राहुड येथे उघडकीस आली आहे. किरकोळ वाटणाऱ्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाने सुपारी किलरच्या मदतीने आपल्याच धाकट्या भावाचा काटा काढला. एवढेच नव्हे, तर खुनाचा पुरावा राहणार नाही, याची खबरदारी घेत मृतदेह शेतातच जाळून त्याची राख नदीत फेकून दिली. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राहुड (ता.बुलढाणा) येथील चेतन संजय इंगळे (वय ३५ वर्षे) हा तरुण २५ फेब्रुवारी २०२६ पासून अचानक बेपत्ता झाला होता. तो घरी न परतल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, गावाचे पोलीस पाटील विलास देविदास बनसोडे यांना चेतनचा खून झाल्याची कुणकुण लागली. त्यांनी तातडीने पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत मुळीक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासचक्र फिरवली आणि संशयाची सुई मृताचा मोठा भाऊ रोशन संजय इंगळे (वय ३६ वर्षे) याच्याकडे वळली.

या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार भागवत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव राजा पोलीस करीत आहेत. राहुडमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून, मालमत्तेसाठी सख्ख्या भावाचा बळी घेणाऱ्या या ‘कॅनिल’ प्रवृत्तीचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

अशी रचली खुनाची ‘स्क्रिप्ट’

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी रोशनने जो गौप्यस्फोट केला, त्याने पोलीसही चक्रावून गेले. रोशनने त्याचा मित्र आणि खामगाव येथील महाकाल चौकातील रहिवासी रवि देविदास राऊत (वय ३६ वर्षे) याला भावाच्या खुनाची सुपारी दिली होती. २५ फेब्रुवारी, दुपारी १.३० वाजता राहुड येथील स्वतःच्या शेतात आरोपींनी चेतनला गाठले. काही कळण्याच्या आत चेतनच्या डोक्यात लोखंडी रॉडने सपासप वार करण्यात आले. वर्मी घाव बसल्याने चेतनचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून दोन्ही नराधमांनी चेतनचा मृतदेह शेतातच जाळला. मृतदेह पूर्ण जळल्यानंतर त्याची राख गोळा करून जवळच असलेल्या नदीत विसर्जित केली, जेणेकरून शरीराचा एकही अवशेष शिल्लक राहू नये.

प्रेमाचा त्रिकोण की जमिनीचा तुकडा?

या थरारक हत्याकांडामागे प्रेमप्रकरण आणि मालमत्तेचा वाद असल्याचे बोलल्या जात आहे. मृत चेतन इंगळे याचे दुसऱ्या जातीतील एका महिलेसोबत (जिला मुलेही आहेत) प्रेमसंबंध होते. चेतनला तिच्याशी लग्न करायचे होते आणि त्यासाठी तो आपल्या वाट्याची शेती विकून पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, घराची शेती विकण्यास मोठ्या भावाचा, रोशनचा तीव्र विरोध होता. याच वादातून रोशनने भावाचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले आणि ११ हजार रुपयांचा ॲडव्हान्स देऊन सुपारी किलर रवि राऊतला पाचारण केले,अशी चर्चा आहे.

शिवाजीनगर पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल कामगिरी

पहिला आरोपी रोशन इंगळे याला पिंपळगाव राजा पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर, दुसरा आरोपी रवि राऊत हा खामगाव शहरात दडून बसल्याची गुप्त माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. शिवाजीनगरचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी, पोलीस अंमलदार संदीप टाकसाल, देवेंद्र शेळके, केशव झाल्टे, राजू कोल्हे, प्रवीण गायकवाड, महिला पोलीस अंमलदार पल्लवी बोर्डे यांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेऊन पिंपळगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन केले.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...