क्राईम जगत

खळबळजनक: ‘पोट दुखतंय’ सांगून हॉस्टेलमधून निघाली अन्…

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : चिखली (जि.बुलढाणा) येथील एका नामांकित फार्मसी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणारी १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच समोर आली. “पोट दुखत असल्याने घरी जात आहे,” अशी नोंद हॉस्टेलच्या रजिस्टरमध्ये करून निघालेली ही विद्यार्थिनी ना घरी पोहोचली, ना हॉस्टेलला परतली. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
चिंचपूर (ता.खामगाव) येथील रहिवासी असलेली सुहानी सुधाकर गवारगुरु (वय १९ वर्षे) ही तरुणी चिखली येथील एका फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. सुहानीने आपले पोट दुखत असून मला विश्रांतीसाठी घरी जायचे आहे, असे हॉस्टेल प्रशासनाला कळवले आणि की, हॉस्टेलच्या ‘आउटगोइंग’ रजिस्टरमध्ये तशी नोंद करून आपली बॅग घेऊन ती बाहेर पडली. मात्र, सायंकाळ होऊनही ती आपल्या गावी चिंचपूर येथे पोहोचली नाही. सुहानी वेळेत घरी न पोहोचल्याने तिचे वडील सुधाकर विश्वनाथ गवारगुरु यांनी तिची विचारपूस सुरू केली. मात्र रात्र उलटूनही सुहानीचा काहीच पत्ता लागला नाही. पालकांनी तिच्या हॉस्टेलमध्ये फोन केला असता, ती दुपारीच निघाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि ओळखीच्या सर्व ठिकाणी शोध घेऊनही सुहानीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
त्यामुळे तिच्या पित्याने चिखली पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मिसिंग दाखल केली आहे. सुहानीची उंची उंची ५ फूट २ इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा असून तिने अंगात पंजाबी ड्रेस घातलेला आहे. सुहानी बेपत्ता झाल्यापासून तिचे कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. पोट दुखण्याचे कारण सांगून निघालेली मुलगी अचानक कुठे गायब झाली, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. उपरोक्त वर्णनाच्या तरुणीबाबत काही माहिती मिळाल्यास चिखली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार लक्ष्मण जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *