“हा माझा शेवटचा कॉल…” आईशी बोलतानाच पुत्राने संपवली जीवनयात्रा
धाड, (प्रतिनिधी): “आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे…” हे शब्द ऐकताच एका माऊलीच्या काळजाचा ठोका चुकला. पोटचा गोळा काहीतरी विपरीत पाऊल उचलतोय हे लक्षात येताच आई आणि भावाने शेताकडे धाव घेतली. मोबाइलवर बोलणे सुरूच होते, आईची आर्त साद कानावर पडत होती, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. डोळ्यादेखत आपल्या मुलाला मृत्यूला कवटाळताना पाहण्याची दुर्दैवी वेळ एका माऊलीवर आली.

करडी (ता.बुलढाणा) येथील रहिवासी असलेले मृतक ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (वय ३९ वर्षे) यांचे धाड येथील भाग १, गट क्र. ५७ मध्ये शेत आहे. सोमवार, २ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. फाशी घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर यांचा फोन येताच अनर्थ घडणार हे ओळखून त्यांची आई आणि भाऊ तातडीने शेताच्या दिशेने धावले. ते शेतात पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. समोरून आई आणि भाऊ येताना दिसताच, ज्ञानेश्वर यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन उडी घेतली. काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली. आई आणि भावाच्या डोळ्यादेखत हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. एका उमद्या तरुणाने अशा प्रकारे जीवनयात्रा संपवल्याने करडी आणि धाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांनी आत्महत्या का केली,याचे कारण समजू शकले नाही. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करीत आहेत.

