अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून, तिला अश्लील इशारे करत आरोपींनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कुरणगाड येथे नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे.
कुरणगाड येथील रहिवासी असलेली एक १५ वर्षीय पीडित मुलगी शालेय शिक्षण घेत आहे. ही पीडिता शाळेत जाण्यास निघाल्यास आरोपी रुपेश अंबदास गोतलकार आणि अमोल समाधान गोतलकार (दोन्ही रा. कुरणगाड) हे मोटारसायकलने दररोज तिचा पाठलाग करत असत. एवढेच नाही तर ती घरी असतानाही आरोपी घराच्या अवतीभोवती चकरा मारून तिला मानसिक त्रास देत होते. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास, पीडिता आपल्या घरासमोर असताना दोन्ही आरोपींनी तिथे येऊन तिला अश्लील हातवारे व इशारे केले. त्यांच्या इशाऱ्यामुळे लज्जा वाटलेल्या पीडितेने “तुम्ही मला असे इशारे का करता? मी तुमचे नाव आई-वडिलांना सांगेन,” असे असे म्हणत आरोपींना जाब विचारला. त्यामुळे संयम संपलेल्या आरोपींनी “जर तू हे तुझ्या आई-वडिलांना सांगितले, तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवाने मारून टाकू,” अशी धमकी त्यांनी दिली. तसेच पीडितेच्या कुटुंबाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ही बाब पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितली.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७८, ३५१ (३), ३५२, ३(५), पोक्सो कायद्याचे कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे हे करीत आहेत.

Leave a comment