क्राईम जगत

खळबळजनक! “लग्न नाही केले तर फोटो व्हायरल करून बदनामी करू”

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): प्रेमविवाहासाठी नकार दिला म्हणून एका तरुणीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “जर लग्न लावून दिले नाही, तर मुलीचे फोटो सोशल मीडियावर टाकून समाजात बदनामी करू,” अशी धमकी देत आरोपींनी तरुणीच्या भावालाही संपवण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांत गुन्हा दाखल करून ठाण्यातील शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळजनक उडाली आहे.

कोल्ही गवळी, जि. बुलडाणा, सध्या रा. शिळफाटा, ठाणे येथे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास असलेल्या १८ वर्षीय पीडित तरुणीचा आरोपी गौतम नंदलाल संधान हा गेल्या काही दिवसांपासून वाईट उद्देशाने पाठलाग करत होता. २ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गौतम संधान आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन नातेवाईकांनी पीडितेच्या घरासमोर येऊन राडा केला.

आरोपी गौतमने पीडितेचा हात धरून तिला ओढले आणि “तू माझ्याशी लग्न कशी करत नाही, तेच मी आता बघतो,” असे म्हणत विनयभंग केला. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी तरुणीच्या आई-वडिलांना धमकावले की, जर लग्न लावून दिले नाही तर मुलीचे फोटो मोबाईलवर व्हायरल करून तिला समाजात बदनाम करू. तसेच तरुणीच्या भावाचा खून करण्याचीही धमकी आरोपीने दिली.

सोशल मीडियावर बनावट मेसेज

आरोपीने पीडितेच्या चुलत भावाच्या इंस्टाग्रामवर फोटो पाठवून ‘आमचे लग्न झाले आहे’ असा खोटा मेसेज पाठवून मानसिक त्रास दिला. या दहशतीमुळे पीडित कुटुंब घाबरून तातडीने रेल्वेने गावी बुलडाणा येथे निघून आले. ठाण्यातील पोलीस ठाण्याची माहिती नसल्याने पीडितेने बुलडाण्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन गाठले. या ठिकाणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौतम नंदलाल संधान (ठाणे), जोगेंद्र सुगदेव प्रधान (कोल्ही गवळी), सरला जोगेंद्र प्रधान (कोल्ही गवळी) आणि दिपाली भागवत सुरवाडे (दिवा, ठाणे) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम ७४, ७८, ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून आता पुढील तपासासाठी शिळ-डायघर पोलीस स्टेशन (ठाणे) येथे वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *