खुशखबर! मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा ठरला महाराष्ट्राचा ‘ग्रोथ लीडर’
मुंबई,(प्रतिनिधी) : मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या मोठ्या औद्योगिक शहरांना मागे टाकत बुलढाणा जिल्हा राज्याचा नवा ‘ग्रोथ लीडर’ म्हणून समोर आला आहे. ‘महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२५-२६’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बुलढाण्याने २२.६ टक्के इतका विक्रमी वृद्धी दर नोंदवून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावर एक मोठी उलथापालथ ठरली आहे.
बुलढाणा जिल्ह्याची अर्थव्यवस्था २०२३-२४ मध्ये ४३,८१५ कोटी होती, ती २०२४-२५ मध्ये थेट ५३,७३८ कोटींवर पोहोचली आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणा आणि स्थानिक उद्योगांमधील वाढती गुंतवणूक ही या यशामागची मुख्य कारणे मानली जात आहेत. राज्यात सर्वाधिक विकास दरात बुलढाण्याचा २२.६ टक्के वृद्धी दर हा मुंबई (११.४ टक्के), पुणे (१२.३ टक्के) आणि नागपूर (११.७ टक्के) यांसारख्या महानगरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे.
अमरावती विभागात वर्चस्व
विभागात देखील बुलढाण्याने आघाडी घेतली आहे. अकोला (९.५ टक्के), अमरावती (११.१ टक्के) आणि यवतमाळ (१२.८ टक्के) या जिल्ह्यांच्या तुलनेत बुलढाण्याची प्रगती सरस ठरली असून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न २०२३-२४ मधील १,३७,२७८ वरून २२.७ टक्क्यांनी वाढून आता १,६८,४६६ इतके झाले आहे. महागाईचा दर वगळता स्थिर किमतींनुसार मोजल्या जाणाऱ्या ‘रिअल जीडीपी’ मध्येही जिल्ह्याने १३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.
ही आकडेवारी पाहता बुलढाणा आता केवळ कृषीप्रधान जिल्हा न राहता राज्याचे एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. विदर्भ क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासाच्या जोरावर हा विकासाचा वेग कायम राखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

