‘धाड’नगरीत घुमणार रामनामाचा जयघोष!
धाड,(प्रतिनिधी) : अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतर आता संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. याच उत्साहाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या ‘धाड’नगरीत यंदाचा राम जन्मोत्सव अभूतपूर्व आणि ऐतिहासिक साजरा करण्यासाठी रामभक्त सज्ज झाले आहेत. या सोहळ्याच्या भव्य नियोजनासाठी आज शुक्रवार, ६ मार्च रोजी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर ‘धर्माप्रती कर्तव्य’ म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. लंका विजयासाठी वानरसेनेत जी ऊर्जा होती, तशाच ऊर्जेने धाडमधील रामभक्तांनी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्थानिक वॉर्ड क्रमांक ६ स्थित राम मंदिराच्या सभागृहात आज ६ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजता ही बैठक पार पडणार आहे. यंदाची रामनवमी ‘धाड’च्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जावी, यासाठी जन्मोत्सव सोहळ्याचे स्वरूप आणि रूपरेषा ठरवणे. शहरातून निघणारी भव्य मिरवणूक, आकर्षक सजावट आणि स्वागत कमानींची उभारणी. येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद आणि शिस्तबद्ध नियोजनाची जबाबदारी, यासह अन्य महत्वाच्या विषयावर मंथन होणार आहे. “रामाचे काम आहे, तिथे विश्रांती नाही!” या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक रामभक्ताने या बैठकीस उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

