बुलढाणा: एसटी चालक-वाहकाला मारहाण नडली!
बुलढाणा,(प्रतिनिधी) : सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि कर्तव्य बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले आहे. चिखली आगारातील चालक आणि वाहकावर हात उचलणाऱ्या अनिल दुर्योधन मोहिते या आरोपीला बुलढाणा न्यायालयाने तीन महिने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने भरलेल्या दंडाची रक्कम पीडित बस चालकाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
चिखली डेपोचे चालक विनोद दत्तू वरपे आणि वाहक वैशाली विजय भुतेकर हे १८ मे २०२४ रोजी बस क्रमांक एमएच-४०-एन-९३६९ घेऊन चिखली स्थानकातून निघाले होते. बसस्थानक परिसरातच आरोपी अनिल मोहिते याने बस थांबवण्यासाठी हात दिला. बस थांबवल्यानंतर त्याने वाहकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.
जेव्हा चालक विनोद वरपे वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले, तेव्हा आरोपीने त्यांचा शर्टाचा कॉलर धरून त्यांना गाडीखाली ओढले, शिवीगाळ केली आणि त्यांचा शर्ट फाडून मारहाण केली. या हल्ल्यात चालक वरपे जखमी झाले होते.
ठाणेदार संग्राम पाटील यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रविकुमार शर्मा यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. एस.पी. हिवाळे यांनी ७ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी आणि डॉक्टरांच्या साक्षी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. कलम ३५३ मध्ये ३ महिने कारावास आणि २ हजार रुपये दंड. (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास), कलम ३३२, ३२३ मध्ये ३ महिने कारावास आणि २ हजार रुपये दंड. आणि विशेष म्हणजे आरोपीने भरलेली दंडाची रक्कम जखमी बस चालकाला देण्यात यावी, असा आदेश दिला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांसाठी हा निकाल एक मोठा धडा मानला जात आहे. “कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा कठोर आहे,” असाच संदेश या निकालातून देण्यात आला आहे.
या तपासात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील आणि कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार नंदाराम इंगळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

